गुवाहाटी : मुख्य निवडणूक आयुक्त हरी शंकर ब्रह्मा यांनी देशाच्या लोकशाहीचा गाडा हाकण्यात महत्त्वाची भूमिका निभावून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेती करण्याची इच्छा प्रकट केली आहे. आसाममधील आपल्या मूळ गावी ते शेती करणार आहेत. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात शेतीमध्ये उतरण्यास लोक धजावत नसताना ब्रह्मा यांच्या या विचाराचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.ब्रह्मा यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती योजनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मला शेतकरी बनण्याची इच्छा आहे. माझ्याकडे आसाममध्ये शेती आहे. मी परत येईन.आंध्र प्रदेश कॅडरमध्ये १९७५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले ब्रह्मा हे आसामचे रहिवासी आहेत. त्यांचा कार्यकाळ येत्या १९ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. या दिवशी ते मुख्य निवडणूक आयुक्तपदासाठीच्या कार्यकाळाची ६५ वर्षे वयाची अट पूर्ण करतील. यंदा १६ जानेवारी रोजी ब्रह्मा यांनी भारताचे १९ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शपथ घेतली होती. २५ आॅगस्ट २०१० रोजी तीन निवडणूक आयुक्तांपैकी एका पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. जे. एम. लिंगडोह यांच्यानंतर ब्रह्मा या पदावर नियुक्त करण्यात आलेले ईशान्य भारतातील दुसरे अधिकारी आहेत. देशाच्या विविध भागांत शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आहेत. कर्ज, पिकांचा भाव आणि शेतकऱ्यांच्या अधिकाराचे मुद्दे त्यांच्याकडून लावून धरले जातात. विविध सरकारी धोरणांसाठी ते सरकारवर दबाव टाकतात, असे ब्रह्मा म्हणाले. (वृत्तसंस्था)
हरी शंकर ब्रह्मा करणार सेवानिवृत्तीनंतर शेती
By admin | Published: March 25, 2015 1:30 AM