रांची : लग्नानंतर धूमधडाक्यात मुलीची पाठवणी करणाऱ्या वडिलांना अनेकदा पाहिले असेल; पण विवाहित मुलीला त्याच थाटामाटात कायमचे माहेरी आणताना कधी पाहिले नसेल; मात्र झारखंडच्या रांचीमधून अशीच घटना समोर आली आहे, ज्यामुळे वडिलांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कैलाशनगर परिसरातील रहिवासी प्रेम गुप्ता यांनी आपली मुलगी साक्षी गुप्ता हिचा सासरी होणारा छळ रोखण्यासाठी धूमधडाक्यात वरात काढली. सासरच्या घरातून बाहेर पडताना आणि माहेरच्या घरी आल्यावर फटाक्यांची आतषबाजी तर केलीच शिवाय ढोल-ताशे वाजवत तिला सन्मानाने घरी आणले. वडिलांच्या या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावलेल्या मुलीने वडिलांसाठी पाेस्टदेखील लिहिली आहे.
वरातीचा व्हिडीओ व्हायरलसाक्षीच्या निर्णयाचे तिच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आणि रविवारी धूमधडाक्यात मुलीला घरी आणले. साक्षीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आपली मुलगी शोषणापासून मुक्त झाल्याच्या आनंदात हे पाऊल उचलले, असे वडील म्हणाले. वरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, ‘बाप असावा तर असा’, ‘समाजासाठी मोठा संदेश दिला आहे’, अशा प्रतिक्रियांसह नेटकरी वडिलांवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
म्हणून संपवले नातेगेल्यावर्षी एप्रिल महिन्यात साक्षीचे सचिन कुमारशी लग्न झाले. तो वीज वितरण महामंडळात सहायक अभियंता म्हणून काम करतो. सचिनचे आधीच दोनदा लग्न झाले होते; पण त्याने ही बाब साक्षी आणि तिच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. लग्नानंतर साक्षीला त्रास देण्यास सुरुवात केली. सचिन तिला घराबाहेर काढायचा. तरी साक्षी सर्व सहन करीत होती. सचिनच्या दोन लग्नांबाबतचे सत्य समजल्यावरही साक्षीने लग्न टिकविण्याचा पूर्ण प्रयत्न केला; मात्र, छळ सहन करणे कठीण झाल्यामुळे तिने नाते संपविले.