हरभजन सिंग काँग्रेसमध्ये जाणार?; सिद्धूंसोबतचे छायाचित्र केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:19 AM2021-12-17T11:19:22+5:302021-12-17T11:19:48+5:30
हरभजन सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे एक छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले आहे.
बलवंत तक्षक
चंडीगड : क्रिकेटपटू हरभजन सिंग उर्फ भज्जी यांनी राजकारणात येण्याचा, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे की काय? पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत ते काँग्रेसचे उमेदवार असू शकतील का? या सर्व चर्चा पंजाबमध्ये जोरात सुरू झाल्या आहेत, कारण हरभजन सिंग आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचे एक छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले आहे.
हरभजन सिंग यांनीच ते आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. छायाचित्राच्या खाली संभावनाओं से भरी तस्वीर (शक्यतांनी भरलेले छायाचित्र) अशा ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्यामुळेच ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. हरभजन जालंदर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे.
Picture loaded with possibilities …. With Bhajji the shining star pic.twitter.com/5TWhPzFpNl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 15, 2021
मात्र या चर्चेविषयी भज्जीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी हरभजन भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा झाली, तेव्हा त्यात तथ्य नाही, आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे भज्जींनी घाईघाईने जाहीर केले होते. आता सुरू झालेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर मात्र ते गप्प आहेत.