दिल्लीमध्ये प्रदुषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षातील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे वायू प्रदुषण लवकरात लवकरत आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वायू प्रदुषण वाढण्यास माझ्यासह आपण सर्वच या परिस्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यातील मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक बोलवावी अशी विनंती करण्यासाठी मी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे हरभजनने सांगितले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता. त्याचप्रमाणे खराब प्रदुषणामुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाण करणे व उतरविणे अडचणीचे ठरत होते. परिणामी, दिल्ली विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांवर परिणाम झाला होता.
दिल्लीतील प्रदूषणाचा पर्यटनाला फटका, परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट
दिल्ली आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी हवेतील प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील परिस्थिती जैसे थे आहे. दिल्ली सरकारने आजपासून खासगी गाड्यांसाठी सम-विषम योजना लागू केली आहे. दिल्लीतील गाड्यांमधून होणारे प्रदूषण आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पराली अर्थात धसकटं जाळली जातात. त्यामुळे दिल्लीच्या हवामानावर त्याचा गंभीर परिणाम होतो. आजूबाजूच्या राज्यांमध्ये हिवाळा सुरू झाला की धसकटं जाळली जातात. यावर बंदी असतानाही ते केले जात असल्याने त्याचा परिणाम दिल्लीच्या हवेवर होतो. त्यामुळे या प्रकरणी सर्व संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरले गेले पाहिजे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन आणि नियंत्रण प्राधिकरणाचे अध्यक्ष भुरे लाल यांनी न्यायालयात केली आहे.