हरीश गुप्ता।नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी समावेश केलेल्या हरदीपसिंग पुरी व अल्फॉन्स कनकनाथम यांना राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतून राज्यसभेवर निवडून आणले जाईल, असे दिसत आहे. हे दोन्ही राज्यमंत्री संसदेचे सदस्य नसून, त्यांना सहा महिन्यांत एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे.व्यंकय्या नायडू व मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. नायडू राजस्थानातून तर पर्रीकर उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्याच जागी हे दोघे निवडून येतील, असे दिसत आहे. हरदीपसिंग पुरी यांना नगरविकास मंत्रालय तर अल्फॉन्स कनकनाथम यांना पर्यटन मंत्रालय देण्यात आले आहे. पुरी हे अरुण जेटली यांच्या विश्वासातील म्हणून ओळखले जातात.निवृत्त झाल्यानंतर कनकनाथम यांनी केरळमध्ये भाजपाच झेंडा हाती घेतला होता. केरळमध्ये भाजपाला पाय रोवता यावेत, म्हणूनच त्यांना मंत्री केले, हे उघड आहे. गेल्या वर्षी भाजपाने मल्याळी अभिनेते सुरेश गोपी यांना राज्यसभा सदस्य केले, तर यंदा आणखी एका मल्याळी व्यक्तीला मंत्रिपद दिले.पुढील वर्षी रेखा, सचिन तेंडुलकर व अनू आगा राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर, केरळमधील आणखी एक चेहरा राज्यसभेत आणायचा भाजपाचा मानस आहे.
हरदीपसिंग पुरी, कनकनाथम यूपी, राजस्थानातून राज्यसभेवर? केरळसाठी भाजपाची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:20 AM