अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचेगुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वावर आपण नाराज असून, पक्षात काम करून दिले जात नसल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केला आहे. त्यानंतर, सातत्याने त्यांचे येणारे विधान आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
आपण प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ हजार भगवद्गीता वाटप करणार आहेत. हिंदू असल्याचा गर्व असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. याबाबत चिंतन केले जाईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता हार्दीक पटेल यांनी व्हॉट्सअपला एक नवीन डीपी ठेवला असून यात ते भगवा गमछा परिधान करुन दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या व्हॉट्अप बायोमधून त्यांनी काँग्रेसला गायब केल्याचं दिसून येत आहे. सध्या ते गुजरातमधील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेस नेतृत्त्वावर नाराज
गुजरातमधील पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे, असे वाटत नाही. पक्षात काम करू देत नाहीत. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल, तरी पक्ष म्हणून ते करू दिले जात नाही. असेच सुरू राहिल्यास आम्ही पक्ष म्हणून लोकांसाठी आवाज उठवणार तरी कसा, असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेऊन हार्दिक पटेल यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलण्यास हार्दिक पटेल यांना पक्षाकडून मनाई करण्यात आली होती.
भाजप सक्षम पक्ष, निर्णय घेण्याची चांगली क्षमता
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वाविरोधात विधाने करत आहेत. चांगला विरोधक म्हणून काँग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे करण्यास आम्ही असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांवर विचार करावा लागेल, असे सूतोवाच हार्दिक पटेल यांनी केले आहे. तसेच भाजप सक्षम पक्ष आहे, त्यांच्याकडे चांगले नेतृत्व आहे. याशिवाय, ते वेळेत आणि योग्य निर्णय घेतात, या शब्दांत हार्दिक पटेल यांनी कौतुक केले आहे. मात्र, याचवेळेस भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.