अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी आणि हार्दिक पटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मात्र दरम्यान हार्दिक पटेल याने आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे.
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.
हार्दिक पटेलने शनिवारी ट्विट केलं आहे. ट्विटरवरुन अल्टिमेटम देताना हार्दिक पटेलने लिहिलं आहे की, '3/11/2017 पर्यंत काँग्रेसने पाटीदार समाजाला घटनात्मक आरक्षण कसे देणार, यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आपली भूमिका स्पष्ट केली नाहीत तर सुरतमध्ये जे अमित शहांसोबत झालं तसंच तुमच्यासोबत होईल'.
सुरतमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीत हार्दिक पटेलच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. पटेल नेत्यांच्या सन्मानार्थ आयोजित या रॅलीत काही लोकांनी तोडफोड करत 'हार्दिक पटेल जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या कार्यक्रमात अमित शाह स्टेजवर पोहोचताच हार्दिक-हार्दिकच्या घोषणा सुरु झाल्या. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.
पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल २ वा ३ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते अधिकृतपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील, असे सांगण्यात आले. ते तसेच नरेंद्र पटेल, जिग्नेश मेवाणी, निखिल वसाणी हे नेते काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.
गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. मोदी यांनीही गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते राज्यात ५0 ते ७0 जाहीर सभा घेणार आहेत.
या वर्षी काँग्रेस व राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे. तेथील लोकांमध्ये असलेले सरकारविरोधी वातावरण व नाराजी यांचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, ते यशस्वी होऊ नयेत, यासाठी स्वत: मोदीच गुजरातमध्ये सभा घेत फिरणार आहेत. या सभा दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातेत होतील. मोदी यांनी या महिन्यात तीनदा तर वर्षभरात १0 वेळा गुजरातचा दौरा केला. भाजपा आणि मोदी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचेच हे संकेत आहेत.