अहमदाबाद - गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. हार्दीक पटेल असे अचानक गायब झाल्यामुळे गुजरातमधील राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. तर हार्दिक यांच्या गायब होण्यामागे गुजरात पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. मात्र गुजरात पोलिस महासंचालकांच्या वतीने किंजल पटेल यांचे हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहे.
माध्यमांशी बोलताना किंजल पटेल म्हणाल्या की, माझे पती हार्दिक आणि कुटुंबीयांना राज्य सरकारकडून नाहक त्रास देण्यात येत आहे. कोणताही पुरावा नसताना आपल्या पतीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून सरकारचा हेतू स्पष्ट होत असल्याचे त्या म्हणाल्या.
2015 मध्ये झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहे. हार्दिक यांच्यावर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक देशद्रोह आणि शांतात भंग करण्याचे आहेत.
किंजल यांनी सांगितले की, हार्दिक पटेल 18 जानेवारीपासून बेपत्ता आहे. त्यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले होते. मात्र त्यांना प्रत्येकवेळी जामीन मिळतो. दुसरीकडे पोलिसांनी किंजल यांचे आरोप फेटाळले आहे. हार्दिक यांच्या बेपत्ता होण्यामागे आमचा हात नसल्याचे गुजरात पोलिसांनी स्पष्ट केले आहे.