Hardik Patel: 'कार्यकारी अध्यक्ष म्हणजे लग्नानंतर मुलाची नसबंदी करणे', हार्दिक पटेल आपल्याच पक्षावर नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:51 PM2022-04-13T18:51:35+5:302022-04-13T18:51:42+5:30
Hardik Patel: हार्दिक पटेल यांनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्यांवर गटबाजीचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली: अनेक राज्यामध्ये काँग्रेसला अंतर्गत वादाचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्येहीकाँग्रेसच्या(Gujarat Congress) नेतृत्वावरुन अंतर्गत वाद चव्हाटावर आला आहे. गुजरातच्या पाटीदार समाजातील मोठे नाव असलेले नरेश पटेल यांच्याबाबत काँग्रेस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळेच गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) आपल्याच पक्षावर नाराज आहेत. एबीपी न्यूजशी केलेल्या संवादात काँग्रेसवर पाटीदार समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
'काँग्रेस नेत्यांकडे निर्णयक्षमतेचा अभाव'
ते म्हणाले की, 'काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षाचा अर्थ लग्नानंतर नवऱ्या मुलाची नसबंदी करण्यासारखा आहे. पक्षातील बड्या नेत्यांच्या गटबाजीमुळे आमचा अपमान होत' असल्याचा आरोप हार्दिकने केला आहे. तसेच, गुजरात आणि दिल्लीच्या काँग्रेस नेत्याकडे निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचेही हार्दिकने यावेळी अधिरेखित केले. यावेळी हार्दिकने विधानसभा निवडणुकीत विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
नरेश पटेल यांच्याबाबत दिले स्पष्टीकरण
दरम्यान, गुजरात प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जगदीश ठाकोर यांनी हार्दिक पटेलने नरेश पटेल यांना केलेल्या विनंतीचे स्पष्टीकरण दिले आहे. जगदीश ठाकोर म्हणाले की, आम्ही (काँग्रेस) पहिल्या दिवसापासून नरेश पटेल यांना आमंत्रण देत आहोत. ठाकोर पुढे म्हणाले की, पटेल यांची विनंती आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली आणि याबद्दल आमचे एवढेच म्हणणे आहे की, काही गोष्टी मीडियामध्ये सांगायच्या नाहीत. काँग्रेसने कोणाचाही अपमान केलेला नाही.
पटेल यांनी कोणत्या बाजूने जायचे हे ठरवावे
त्याचवेळी ते नरेश पटेल यांच्याबद्दल म्हणाले की, त्यांनी (नरेश पटेल) कोणत्या बाजूने जायचे हे ठरवायचे आहे. नरेश पटेल यावर जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत प्रदेश काँग्रेस काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हार्दिक पटेलनेही यंदा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.