Gujarat Election 2022:गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते हार्दिक पटेल(Hardik Patel) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता या सर्व चर्चांवर स्वतः हार्दिक पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मी कामगारांच्या हितासाठी लढत आलोय. नाराजी प्रत्येक कुटुंबात असते, पण आपण सामर्थ्यवान बनायला हवं," अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.
'मी राहुल-प्रियंकांवर नाराज नाही'आज गुजरातकाँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे कौतुक करण्याच्या प्रश्नावर म्हटले की, "मी जो बायडेन यांचेही कौतुक केले होते, त्याचा अर्थ मी त्यांच्या पक्षात सामील होतोय, असा होतो का? मी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यावर नाराज नाही. मी राज्य नेतृत्वावर नाराज आहे. मी अस्वस्थ, कारण निवडणुका येत आहेत आणि अशा वेळी प्रामाणिक आणि कणखर लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे," असेही पटेल म्हणाले.
'अफवा पसरवू नका'ते पुढे म्हणतात की, "पक्ष मजबूत करण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. निवडणुकीचा काळ आहे, गावोगावी आणि शहरांमध्ये जाऊन पक्षाच्या नेत्यांना मेहनत करावी लागेल. प्रत्येक कुटुंबात नाराजी असते, प्रश्न निर्माण होतात. पण, त्याचा एकच अर्थ लावायचा नसतो. मी यापूर्वीही स्पष्ट केले होते, अफवा पसरवू नका," असेही ते म्हणाले.
यावर्षी गुजरातमध्ये निवडणूकगुजरातमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार नेते नरेश पटेल यांना पक्षात सामावून घेण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे हार्दिक नाराज असल्याचे बोलले जात आहे. नरेश पटेल पक्षात सामील झाल्यास पाटीदार समाजाचा नेता म्हणून हार्दिकचा प्रभाव संपुष्टात येईल, असे अनेकांचे मत आहे.