अहमदाबाद : तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होण्याआधीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. पाटीदार आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक चर्चेत आले होते. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते.
आपली निराशा व्यक्त करताना त्यांनी आरोप केला की, माझ्यासारखे कार्यकर्ते बैठकीत मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसात ५०० ते ६०० किलोमीटर प्रवास करतात. त्यांना आढळते की, नेते वरिष्ठांसाठी सँडविच उपलब्ध करण्यात व्यस्त आहेत. गुजराती लोकांच्या हिताशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ मोबाईल फोनवर आणि अन्य बाबीत व्यस्त दिसले. (वृत्तसंस्था)