अहमदाबाद - गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले आहेत. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला.
हार्दिक यांच्या लग्नासाठी दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी अशा काही महत्त्वाच्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम तालुक्यातील चंदननगरी परिसरात हार्दिक आणि किंजल हे अनेक वर्षे राहायचे. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून पुढचे शिक्षण घेत आहे.
सुरेंद्र नगर जिल्ह्यातील दिगसर गावातील हार्दिक पटेल यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. हार्दिक यांचे वडील भरत पटेल यांनी याआधी 'हार्दिकने लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावं अशी सर्वांचीच इच्छा होती. किंजलचे आडनाव पारीख असले तरी हा आंतरजातीय विवाह नाही. किंजल ही पारीख-पटेल असून पाटीदार समाजाचीच आहे' असे सांगितले होते.