'... त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे', भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान हार्दिक पटेल यांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:21 PM2022-04-26T16:21:52+5:302022-04-26T16:23:15+5:30
Hardik Patel : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली : साधारणपणे प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या बातम्या समोर येऊ लागतात. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेलने या चर्चांना पूर्णविराम देत सध्या काँग्रेसमध्ये असल्याचे म्हटले आहे.
हार्दिक पटेल यांनी ट्विट केले आहे की, "मी सध्या काँग्रेसमध्ये आहे. मला आशा आहे की, केंद्रीय नेते काहीतरी मार्ग काढतील, ज्यामुळे मी काँग्रेसमध्ये राहू शकेन. असे काही आहेत, ज्यांना हार्दिकने काँग्रेस सोडावी अशी इच्छा आहे. त्यांना माझे मनोधैर्य तोडायचे आहे." दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल हे काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस हटवले
पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी दिल्लीत भाजपच्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. तसेच, हार्दिक पटेल यांनी व्हॉट्सअॅपवरील डीपीही बदलला आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप बायोमधून काँग्रेस सुद्धा हटवले आहे. व्हॉट्सअॅपवरील नवीन डीपीमध्ये हार्दिक पटेल यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टीका
पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता असलेल्या हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टीका केली होती आणि पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर, ते सातत्याने भाजपचे कौतुक करत आहेत. अशा स्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता भाजपच्या नेत्याच्या भेटीनंतर ते पक्षप्रवेश करण्याची जोरदार शक्यता वर्तविली जात आहे.