नवी दिल्ली: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने जयपूर येथे मेगा चिंतन शिबिर आयोजित केले. मात्र, त्यातूनही काही ठोस निर्णय किंवा संदेश न गेल्याची चर्चा सुरू आहे. यातच आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. हार्दिक पटेल यांनी (Hardik Patel) पक्षावर आरोप करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना खुद्द हार्दिक पटेल यांनी खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना, हार्दिक पटेल यांनी आपण जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तेव्हा वडील नेहमी तू चुकीचा पक्ष निवडला आहेस सांगायचे असा खुलासा केला. यावेळी हार्दिक पटेल यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला. निर्णय झाला आहे. लवकरच तुम्हाला याची माहिती मिळेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या राजकीय आयुष्यात चार मुद्दे सोबत घेत पुढील वाटचाल करत असतो, ज्यामध्ये समाज, देस आणि राज्याच्या भल्याचाही विचार असतो, असे हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार का?
पुढील वाटचाल करत असताना काँग्रेस पक्षात राहून जे मिळवू शकलो नाही ते सर्व मिळवायचे आहे. त्याच मार्गावर चालणार असून गुजरातमधील जनतेच्या भल्यासाठी काम करणार आहे, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले. भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी पुढील १० दिवसांत आपला निर्णय जाहीर करु, असे सांगत, गेल्या सात वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत नाही. गुजरातमधील जनतेला काँग्रेस पक्ष आवडत नसून त्यांना स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांची पसंती भाजपला आहे. मी ज्या चार मुद्द्यांबाबत बोलत आहे ते सत्तेत असणाऱ्या पक्षाशी सुसंगत आहेत. पुढील १० दिवसांत माझा निर्णय सर्वांसमोर असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पत्नी आणि तिचे कुटुंब आनंदी आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या विचारधारेसोबत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्नीच्या कुटुंबाने निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. माझे वडीलही जिवंत होते तेव्हा त्यांना तू चुकीचा पक्ष निवडल्याचे म्हटले होते. आता माझ्या कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.