नवी दिल्ली/गांधीनगर: पाटिदार आंदोलनामुळे चर्चेत आलेले हार्दिक पटेलकाँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या काही विधानांमधून नाराजी स्पष्टपणे दिसली आहे. आता पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस नेता हा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे पटेल काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला आहे. आता त्यांच्या बायोमध्ये 'देशभक्त, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता,' असा उल्लेख आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस सोडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हार्दिक पटेल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी याबद्दल भाजपचं कौतुक केलं. तेव्हापासून पटेल यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या. त्यात आता त्यांचा ट्विटर बायो बदलला आहे. त्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
हार्दिक पटेल यांचे ट्विटरवर १८ लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. काँग्रेसमध्ये महत्त्व दिलं जात नसल्यानं पटेल नाराज आहेत. वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांनी स्वत:च्या अडचणी मांडल्या होत्या. पाटिदार आरक्षणावेळी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात त्यांना न्यायालयानं नुकताच दिलासा दिला. त्यामुळे पटेल यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.