पाटीदार आंदोलनाचा नेता आणि काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहेत.
गुजरातमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पटेल नाराज असल्याचे बोलले जात होते. ते भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.
मी आज खूप धाडस करून काँग्रेस पक्षाचे पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचे स्वागत माझे सहकारी आणि गुजरातची जनता करेल, असा मला विश्वास आहे. यानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखरच सकारात्मक काम करू शकेन, असे ट्विट हार्दिक पटेल यांनी केले आहे.
हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या काही विधानांमधून नाराजी स्पष्टपणे दिसली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस नेता हा उल्लेख काढून टाकला होता. हार्दिक पटेल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा उल्लेख केला होता. त्यांनी याबद्दल भाजपचं कौतुक केलं. तेव्हापासून पटेल यांच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम देत सध्या काँग्रेसमध्ये असल्याचे म्हटले होते. परंतू आज त्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली.