Hardik Patel: “राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत, त्यापेक्षा अरविंद केजरीवाल बरे”: हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 01:34 PM2022-05-29T13:34:20+5:302022-05-29T13:34:59+5:30
अरविंद केजरीवाल चांगले राजकारणी आहेत, ते देशात आपले स्थान निर्माण करत आहेत, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच पाच राज्यांत पराभूत झालेल्या काँग्रेसला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला रामराम करताना पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका केली. हार्दिक पटेल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला असून, राहुल गांधी (Rahul Gandhi) नेते म्हणून अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बरे, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला आहे.
काँग्रेसमध्ये काम करण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली. दरम्यान, आता हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पटेल यांनी आपण जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तेव्हा वडील नेहमी तू चुकीचा पक्ष निवडला आहेस सांगायचे असा खुलासा केला होता. पुढील वाटचाल करत असताना काँग्रेस पक्षात राहून जे मिळवू शकलो नाही ते सर्व मिळवायचे आहे. त्याच मार्गावर चालणार असून गुजरातमधील जनतेच्या भल्यासाठी काम करणार आहे, असे हार्दिक पटेल म्हणाले होते.
राहुल गांधी अजिबात आवडत नाहीत
शक्ति सिंह गोयल हे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरी आले होते. मात्र, राहुल गांधी यांनी तेवढेही सौजन्य दाखवले नाही. इतकेच नव्हे तर प्रदेशमधील कोणताही बडा नेता आला नाही. सांत्वन केले नाही, अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली. अरविंद केजरीवाल चांगले आहेत कारण निदान ते मॉडेल बनवून देशात आपले स्थान निर्माण करत आहेत. आम आदमी पक्षाचा द्वेष करत नाही, पण जेव्हा गुजरातच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा गुजरातच्या अभिमानाच्या पाठीशी उभा राहीन, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी लवकरच आपला निर्णय जाहीर करु, असे सांगत, गेल्या सात वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत नाही. गुजरातमधील जनतेला काँग्रेस पक्ष आवडत नसून त्यांना स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांची पसंती भाजपला आहे. असे हार्दिक पटेल यांनी सांगितले होते.