नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पाटीदार आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक चर्चेत आले होते. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. यानंतर आता पुन्हा एकदा हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पक्ष लोकांच्या भावना दुखावतो आणि हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते भरत सिंह सोलंकी यांनी केलेल्या विधानावर टीका करत त्यांना सवाल विचारला आहे.
हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "मी याआधीही म्हटलं होतं की, काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचं काम करतो, हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असं विधान केलं. मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचं आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे? तुम्ही हिंदूंचा इतका द्वेष का करता? शतकांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले जात आहे, तरीही काँग्रेसचे नेते प्रभू श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत" असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष' आहे असं म्हणत हार्दिक पटेल यांनी निशाणा साधला होता. "काँग्रेस हा सर्वात मोठा जातिवादी पक्ष आहे आणि राज्य युनिटच्या कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना कोणतीही कर्तव्ये न सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही" असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. यासोबतच हार्दिक यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. तसेच मी ज्येष्ठ पाटीदार नेत्यांची आणि मित्रांची माफी मागतो. त्यांनी मला काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला देत सावध केले होते. परंतु मी ऐकलं नाही असंही म्हटलं आहे.
सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केलं आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे. या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिक यांनी सांगितलं आहे.