Hardik Patel vs Congress : "पुढील २० वर्षे काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही"; पक्षाला रामराम ठोकल्यावर हार्दिक पटेल यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:11 PM2022-05-19T16:11:14+5:302022-05-19T18:59:24+5:30
काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर कोणत्या पक्षात जाणार, यावरही केलं भाष्य
Hardik Patel vs Congress : काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपा किंवा इतर पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. यासोबतच, काँग्रेसवर टीका करताना, गुजरातमध्ये पुढची २० वर्षे काँग्रेस जिंकू शकणार नाही, असा रोखठोक विधानही त्यांनी केले.
काँग्रेस सोडण्याचा निर्णय मी स्वत:च्या मर्जीने घेतला. पण दुसऱ्या कोणत्या पक्षाच जायचं याचा मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. जेव्हा मी याबद्दल निर्णय घेईन त्यावेळी नक्कीच त्या संदर्भात घोषणा करेन, असे हार्दिक पटेल म्हणाले. "काँग्रेस पक्षाची अवस्था फारशी चांगली नसताना पक्षातील मोठ्या पदावरील महत्त्वाची नेतेमंडळी परदेशात पार्ट्यांमध्ये व्यस्त असतात. त्यांना फक्त एसी रूममध्ये बसून चिकन सँडविच खाण्यातच रस असतो. राहुल गांधींना मी अनेकदा विनंती करूनही मला काँग्रेसमध्ये फारशी महत्त्वाची भूमिका देण्यात आली नाही. त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की गुजरातमध्ये पुढची २० वर्षे काँग्रेस सत्तेत येऊ शकणार नाही", अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
"PM गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा राग अदानी, अंबानींवर का काढता?", हार्दिक पटेल यांचा सवाल
हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये असताना भारतातील प्रसिद्ध उद्योजक अंबानी आणि अदानी यांच्यावर काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली होती. या दोघांना केंद्र सरकार नियमबाह्य पद्धतीने फायदा मिळवून देत असल्याचा आरोप केला होता. तसेच, या उद्योजकांना केंद्र सरकारकडून जास्त महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही झाला होता. परंतु, काँग्रेस सोडताच हार्दिक यांनी काँग्रेसच्या या दाव्यांचा समाचार घेतला. अदानी, अंबानी यांच्यासारखे उद्योजक कोणाच्याही मेहेरबानीमुळे नव्हे तर त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर मोठे व यशस्वी झाले आहेत, असंही हार्दिक पटेल म्हणाले.