अहमदाबाद- पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आरक्षण सुरु केले आहे. आजपासून आपल्या घरामध्येच हार्दिकने अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केले. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे असा आरोप त्याने गुजरात सरकारवर केला आहे.
या उपोषणामुळे जुनागडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले आहे. सार्वजनिक जागेवर 4 पेक्षा अधिक लोकांनी जमण्यास बंदी घातली गेली आहे. हार्दिकने मात्र सर्व कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे असे स्पष्ट केले आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 25 ऑगस्ट 2015 रोजी गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन झाले होते. त्यामध्ये सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते आणि 14 लोकांनी आपले प्राण गमावले होते.अहमदाबादच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर माझ्या समर्थकांना रोखण्यात येत आहे आणि आतापर्यंत 16 हजार लोकांना ताब्यात घेण्य़ात आले आहे. चार पेक्षा जास्त लोकांना घरापर्यंत जाण्याची परवानगी नाकारली आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी करण्यात येत आहे असा दावा हार्दिकने केला आहे. उपोषणासाठी मांडव आणि पाण्याची सोयही करण्यास मला मज्जाव केला जात आहे. या आंदोलनासाठी दोन महिने आधीच परवानगी मागितली होती मात्र परवानगी मिळाली नाही. हे सरकार इंग्रजांप्रमाणे काम करत आहे, उपोषण रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असा आरोप त्याने केला आहे.
हार्दिकच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे ललित कथगरा, ललित वसोया, किरिट पटेल हे तीन पाटीदार नेतेही आले आहेत. सरकारने आपल्याला उपोषणासाठी परवानगी दिली नाही किंवा न्यायालयाने आपला जामिन रद्द केला तरी शनिवारपासून उपोषणाला बसणारच असा निर्धार हार्दिक पटेलने शुक्रवारी व्यक्त केला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेलच्या घराजवळ प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्याच्या घरात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे.