Hardik Patel: “भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करु देत नाहीत”; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 02:58 PM2022-04-22T14:58:49+5:302022-04-22T15:00:01+5:30

Hardik Patel: हिंदू असल्याचा गर्व असून, स्वतःला रामभक्त म्हणवणारे हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

hardik patel to rebelled against congress in gujarat and says devotees of ram and proud to be hindu | Hardik Patel: “भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करु देत नाहीत”; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत

Hardik Patel: “भाजप सक्षम पक्ष, काँग्रेसमध्ये काम करु देत नाहीत”; हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत

Next

अहमदाबाद: अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आता पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. हार्दिक पटेल यांनी स्वतः तसे संकेत दिले आहेत. गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वावर नाराज असून, पक्षात काम करून दिले जात नसल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

गुजरातमधील पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे, असे वाटत नाही. पक्षात काम करू देत नाहीत. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल, तरी पक्ष म्हणून ते करू दिले जात नाही. असेच सुरू राहिल्यास आम्ही पक्ष म्हणून लोकांसाठी आवाज उठवणार तरी कसा, असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेऊन हार्दिक पटेल यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलण्यास हार्दिक पटेल यांना पक्षाकडून मनाई करण्यात आली होती. 

भाजप सक्षम पक्ष, निर्णय घेण्याची चांगली क्षमता

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेतृत्वाविरोधात विधाने करत आहेत. चांगला विरोधक म्हणून काँग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे करण्यास आम्ही असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांवर विचार करावा लागेल, असे सूतोवाच हार्दिक पटेल यांनी केले आहे. तसेच भाजप सक्षम पक्ष आहे, त्यांच्याकडे चांगले नेतृत्व आहे. याशिवाय, ते वेळेत आणि योग्य निर्णय घेतात, या शब्दांत हार्दिक पटेल यांनी कौतुक केले आहे. मात्र, याचवेळेस भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. 

मी राम भक्त, हिंदू असल्याचा मला गर्व

प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. तसेच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ४ हजार भगवद्गीता वाटप करणार आहेत. हिंदू असल्याचा गर्व असल्याचे पटेल यांनी नमूद केले आहे. राजकीय परिस्थितीवर लक्ष असून, याबाबत चिंतन केले जाईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल, असे हार्दिक पटेल म्हणाले. 
 

Web Title: hardik patel to rebelled against congress in gujarat and says devotees of ram and proud to be hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.