हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 10:54 IST2019-03-07T10:53:47+5:302019-03-07T10:54:30+5:30
पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते.

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाणार; लोकसभाही लढणार
बडोदा : गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
12 मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या बैठकीला काँग्रेसते अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. ज्या जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल उभ राहणार आहेत तेथून सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत.
बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एका सभेला संबोधित करणार आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांना नाकीनऊ आणले होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला मोठी मदत केली होती. यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करणार आहे.
हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे.
गुजरात मॉडेलचे खरे रुप...
हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते. आम्हाला या लोकांनी देशभक्ती काय असते हे शिकविण्याची गरज नाही, असेही हार्दिक यांनी म्हटले आहे.
पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. यावेळी हिंसाही झाली होती. तसेच चिथावणी दिल्याने झालेल्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.