अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाला वेग यायला हळूहळू सुरुवात होत असल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करणारे हार्दिक पटेल आज म्हणजेच गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी हार्दिक पटेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांनी मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन.
दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या प्रवेशाचा आनंद भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. हार्दिक पटेलचे गांधीनगर येथील भाजप कार्यालयाबाहेर पोस्टर लावून स्वागत करण्यात येत आहे. पत्रकारांशी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले की, आज मी एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. मी लहान सैनिक म्हणून काम करेन. आम्ही दर 10 दिवसांनी एक कार्यक्रम करू, ज्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आमदारांसह नेत्यांना भाजपमध्ये सहभागी होण्यास सांगितले जाईल. तसेच, पंतप्रधान मोदी हे संपूर्ण जगाची शान असल्याचेही हार्दिक यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला होता. या पत्रात त्यांनी पक्षाच्या राज्य युनिट तसेच सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसणे सुरूच आहे. यातच हार्दिक पटेल यांनी पक्ष आणि नेतृत्वावर सडकून टीका करत, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सन २०१४ मध्ये पाटीदार आंदोलनाच्या निमित्ताने प्रथम हार्दिक पटेल यांची चर्चा देशभर झाली होती. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या सरकारविरोधात रान उठवण्यात आले होते. शेवटी भाजपने आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर करत विजय रुपाणी यांना नवे मुख्यमंत्री केले.
२०१५ मध्ये पहिली मोठी रॅलीसरदार पटेल ग्रुपमध्ये सक्रीय सहभागी झाल्यानंतर पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सन २०१५ विसनगर येथे पहिली मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये हार्दिक पटेल यांचा सक्रीय सहभाग होता. एका भाजप खासदाराच्या पक्ष कार्यालायाची तोडफोड केल्याचा आरोप तेव्हा हार्दिक पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने याप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने हार्दिक पटेल यांना मोठा दिलासा दिला होता.