लखनौ - मंदिरातील एका कार्यक्रमामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातून चक्क दारूच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रतापामागे दुसरेतिसरे कोणी नसून भाजपाचे नेते नरेश अग्रवाल यांच्या पुत्राचा हात असल्याचे म्हटले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमादरम्यान नरेश अग्रवाल स्वतः उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील हरदोई येथील ही घटना आहे. नरेश अग्रवाल यांनी हरदोईतील मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यांचा मुलगा नितिननं, या कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून उपस्थितांमध्ये वाटल्या. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. पुरीभाजीच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या या फोटोमध्ये दिसत आहे. यावर भाजपा खासदार अंशुल वर्मा यांनी टीका केली आहे. वर्मा यांनी म्हटलंय की,'घडल्या प्रकाराची माहिती मी पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवेन. ही चूक सुधारण्यासाठी भाजपाला विचारविनिमय करावा लागणार आहे'.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेश अग्रवाल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या मुलानं अखिलेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे. 38 वर्षांच्या राजकीय कारर्कीदीमध्ये नरेश अग्रवाल यांनी तब्बल चार वेळा पक्ष बदलले आहेत.