नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींवर पोहोचली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येभाजपाशासित सरकार असूनही भाजपाच्या आमदाराला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी महिन्याभरापासून चकरा माराव्या लागत असल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल (Rajkumar Agrawal) गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत.
राजकुमार अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे याबाबत तक्रार केली. मात्र कोणीच त्यांचं ऐकून घेत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलला काकोरीच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मुलाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 26 एप्रिलला त्यांच्या मुलाचे निधन झाले. मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. "26 एप्रिलला मुलांचं ऑक्सिजन लेव्हल 94 इतकी होती. तो नीट जेवतही होता. सर्वांशी संवाद देखील साधत होता."
"संध्याकाळी अचानक डॉक्टरांनी सांगितलं त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. त्याच्यासाठी आम्ही दोन ऑक्सिजन सिलिंडरचा बंदोबस्त केला. मात्र डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलिंडर त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला" असा आरोप भाजपा आमदार राजकुमार अग्रवाल यांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे झालं आहे. याबाबतची तक्रार मी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. मात्र अद्याप माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. माझी मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावं आणि हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मेघालयमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. या महिन्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत जवळपास पाचपट वाढ झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीसमोर तिथलं सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी एक विधान केलं आहे." माणूस स्वत:ला वाचवू शकणार नाही, आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपण कुणीच नाही" असं म्हटलं आहे. तसेच येत्या 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सर्वांना आपल्या घरी आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं आहे. मेघालय सरकारनं त्यासंदर्भात परिपत्रकच काढलं आहे. मेघालयमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 731 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.