नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हरदोईमध्ये एखाद्या चित्रपटासारखी घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. एका तरुणीने आपल्या नवऱ्याला उत्तमरित्या साथ दिली आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच एका रस्ते अपघातात नवरदेवाला त्याचा एक पाय गमावावा लागला. त्यानंतर मुलीने हॉस्पिटलमध्ये सोबत राहून त्याची काळजी घेतली. एवढंच नाही तर नंतर त्याच्याशीच लग्न केलं आणि त्याची पत्नी झाली. या तरुणीच्या धाडसामुळे सर्वत्र या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरदोईमधील हन्नपसिगवामध्ये ही घटना घडली आहे. कलेक्टरचा मुलगा आदित्यचा विवाह खेरी जिल्ह्यातील जामुका गावात राहणाऱ्या सरोजिनीशी ठरला होता. दोघांचा साखरपुडा झाला होता परंतु, 1 एप्रिल 22 रोजी रात्री उशिरा गावाकडून जहनीखेडा येथे जात असताना अज्ञात वाहनाने आदित्यच्या दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. चांगल्या उपचारांसाठी आदित्यला शाहजहानपूर आणि तिथून लखनौला नेण्यात आलं. लखनौमध्ये आदित्यच्या पायावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली, पण ती यशस्वी झाली नाही. यानंतर आदित्यच्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आदित्यला पाय गमवावा लागला.
आदित्यवर उपचार सुरू असताना सरोजिनीने त्याची साथ सोडली नाही. त्याच्याबरोबर राहून त्याची काळजी घेतली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आदित्य त्याच्या घरी गेला आणि सरोजिनी तिच्या घरी गेली. आदित्यला झालेल्या अपघातानंतर सरोजिनीच्या कुटुंबीयांच्या मनात या लग्नाबाबत थोडी शंका होती. त्यांनी सरोजिनीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सरोजिनीने आदित्यशी लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर बोलून दाखवला. सरोजिनीच्या आग्रहास्तव आदित्य आणि सरोजिनी यांचं लग्न ठरलेल्या तारखेला झालं. आता सरोजिनी आपल्या पती आणि कुटुंबासह खूश आहे.
सरोजिनीचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे. तिचे वडील रामशंकर शेती करतात आणि तिला आई नाही. वडील आणि आजी-आजोबांनी तिचं पालनपोषण केलं. तिला 2 लहान भाऊ आहेत. आदित्य आणि सरोजिनीचा साखरपुडा गेल्या वर्षी जूनमध्ये झाला नंतर अपघातात आदित्यने पाय गमावला. त्यानंतर यांचं लग्न कसं होणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु सरोजिनी आदित्यशी लग्न करण्याचा तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. अखेर ठरलेल्या तारखेला 12 मे 22 रोजी सरोजिनीनी आदित्यसोबत सप्तपदी घेत आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.