मेहसाणा - गुजरात निवडणुकांआधी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला गुजरातच्या स्थानीक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हार्दिक विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. पाटीदार आरक्षणप्रकरणी गुजरातमध्ये रान उठवणारा हार्दिक पटेल आणि त्याचा सहकारी लालजी पटेल यांच्याविरोधात वासनगर सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. हार्दिक पटेलने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. अटक वॉरंट रद्द करण्यात आलं, सत्यमेव जयते असं ट्वीट त्याने गुजराती भाषेत केलं.
भाजपा आमदार ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले होते. जुलै 2015 साली विसानगरमध्ये पाटीदार अनामत समितीचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. 2016 साली याच ऋषीकेष पटेल यांच्या गाडीवर विसानगर येथील आयटीआय सर्कलजवळ दगडफेक करण्यात आली होती. विसानगर हे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे एक प्रमुख केंद्र होते. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या त्याचदिवशी हे वॉरंट निघाले आहे. दरम्यान गुजरातमधील राजकीय वातावरण तापले असून गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे आले होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. उत्तर गुजरातेतील मंडल येथे सोमवारी रात्री मेळाव्यात ते बोलत होते. पटेल म्हणाले, काँग्रेस हा चोर असला, तरी भाजपा महाचोर आहे. महाचोराला पराभूत करायचे असेल, तर चोराला पाठिंबा आम्हाला द्यावा लागेल व तो आम्ही देऊ, परंतु त्यासाठी संयम दाखवावा लागेल. सध्या तरी आम्ही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटेल यांनी, मी सोमवारी उम्मेद हॉटेलमध्ये होतो, परंतु राहुल गांधींना मी भेटलो, अशा बातम्या आल्या असल्या, तरी त्या चुकीच्या आहेत. काँग्रेसकडून निमंत्रण आल्यावर मी रविवारी रात्री ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. मी गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांना भेटलो. तसाही उशीर झाला होता, त्यामुळे मी हॉटेलमध्येच थांबायचे ठरवले, परंतु त्यांनी (भाजपा) सीसीटीव्ही कॅमेºयाच्या क्लिप्ज मिळविल्या व पसरविल्या. कारण येथील सगळ्याच गोष्टी या त्यांच्या मालमत्ता आहेत, असे हार्दिक पटेल म्हणाले.