कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. तर भाजप बंगाल मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. संपूर्ण निवडणुकीत या दोनच पक्षात खरी लढत बघायला मिळाली. या संपूर्ण निवडणूक काळात दोन्ही पक्षांकडून आलेल्या अनेक वक्तव्यांची आणि घोषणांचीही माध्यमांत जबरदस्त चर्चा बघायला मिळाली.
चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. मी पाण्यातील साप नाही. मी कोबरा आहे. एकाच बाइटमध्ये काम तमाम करेन.
भाजपची घोषणा - 'हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे'डिसेंबर 2020 मध्ये तृणमूल सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांनी आपल्याच एका जाहीर सभेत एक घोषणा दिली होती. ही घोषणा वैष्णव समुदायशी संबंधित होती. ही घोषणा आता भाजपची सिग्निचर स्टाइल झाली आहे. ही घोषणा म्हणजे, 'हरे कृष्ण हरे हरे, बीजेपी घरे घरे'. हरे कृष्ण हरे हरे भजनाचे निर्माते संत चैतन्य महाप्रभू यांचा उल्लेख करत शुभेंदू अधिकारी म्हणाले होते, आमची पुरुषोत्तम राम आणि श्री चैतन्य दोघांवरही श्रद्धा आहे. ही घोषणा थोड्याच दिवसांत एवढी प्रसिद्ध झाली, की शुभेंदू अधिकारी सभांमध्ये केवळ हरे कृष्ण हरे हरे एवढेच म्हणत आणि पुढचे वाक्य समोरील जनता पूर्ण करत.
सर्वत्र ऐकायला मिळाले खेला होबे -याप्रकारे टीएमसीचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनब्रत मंडल हे आपल्या केवळ दोन शब्दांनीच चर्चेत आले. त्यांनी आपल्या 31 जानेवारीच्या सभेत 'खेला होबे'चा वापर केला होता. यानंतर हे दोन शब्द हवेसारखे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पसरले. ममतांनीही अनेक ठिकाणी या घोषणेचा उल्लेख केला. हे गाणं 25 वर्षीय देबांग्शु भट्टाचार्य यानी लिहिले आहे. ते टीएमसीचे राज्य प्रवक्ते आहेत. बीरभूमचे नेते अणुब्रत मंडल यांनी एका रॅलीत या गाण्याला नवे बोल देत ‘भयंकर खेला होबे’ म्हटले होते.
'दो मई, दीदी गई' आणि 'टीएमसी के गद्दारों...' सारख्या घोषणा -याशिवाय गायक नचिकेता चक्रवर्तीच्या एका गण्यावरून सोशल मिडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. ममतांच्या जवळील असलेल्या नचिकेता यांच्या या गाण्यात पक्ष सोडलेल्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला होता. भाजपकडून ज्या घोषणा देण्यात आल्या त्यात 'दो मई, दीदी गई' या घोषणेचाही समावेश होता.