CG Hareli Tihar 2024:छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ४ ऑगस्ट रोजी शासकीय निवासस्थानी हरेली तिहार उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित केले. छत्तीसगढच्या लोकसंस्कृतीचा पहिला सण असलेल्या हरेलीनिमित्ताने मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि त्यांची पत्नी कौशल्या देवी साय यांनी गौरी-गणेश पूजा केली आणि भगवान शंकराला अभिषेक केला. मुख्यमंत्री साय यांनी नांगर, रापा, कुदळ आणि कृषी अवजारांची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
शेतकऱ्यांना सुख-समृद्धी आणणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी मिळवून देणे आहे. छत्तीसगड हे कृषीप्रधान राज्य आहे, जिथे ८० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे, असे मुख्यमंत्री साय म्हणाले. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
मुख्यमंत्री साय यांनी डॉ. रमणसिंग यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. "रमण सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कृषी कर्जावर शून्य टक्के व्याज सारख्या सुविधा मिळाल्या. राज्य सरकार आता शेतकऱ्यांकडून प्रति एकर २१ क्विंटल धान ३१०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करत आहे," असेही मुख्यमंत्री साय यांनी सांगितले.
यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रगत कृषी उपकरणांच्या प्रदर्शनाला मु्ख्यमंत्री साय यांनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी २३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांच्या चाव्यांचे वाटप केले. विधानसभा अध्यक्ष डॉ. रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, कृषिमंत्री रामविचार नेताम, खासदार ब्रिजमोहन अग्रवाल, आमदार किरण सिंह देव आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कौशल्या देवी साई यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. राज्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री साय यांच्या समर्पणाचे कौतुक करताना डॉ. रमण सिंह म्हणाले की, चांगला पाऊस हा दैवी आशीर्वाद असतो. मुख्यमंत्री साय यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचेही रमण सिंह यांनी कौतुक केले.