अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठताना भाजपाची पुरती दमछाक झाली. पण अडखळत धडपडत का होईना भाजपाला बहुमताचा जादुई आकडा गाठून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यशस्वी ठरले. जीएसटी, नोटाबंदीमुळे असलेली नाराजी, पटेल आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे 22 वर्षांपासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिकट परिस्थितीत मोर्चा सांभाळत भाजपाला हरलेली बाजी दिंकून दिली. खरंतर गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला, हिंदुत्वाची प्रयोगशाळा, मोदींच्या विकासाचे मॉडेल वगैरै वगैरे असल्याने काही झालं तरी गुजराती मतदार भाजपाला साथ देणार हे निश्चित मानले जायचे. 1995 पासून झालेल्या गुजरात विधानसभांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपाने भक्कम बहुमत मिळवलेले. त्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत तर गुजरातमधून लोकसभेच्या 26 पैकी 26 जागा भाजपाने जिंकलेल्या. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता. मात्र प्रत्यक्षात दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात गुजरातमध्ये नाराजी मूळ धरत होती. पाटीदार आंदोलनातून या नाराजीला तोंड फुटले. पुढे दलित अत्याचाराच्या मुद्यावरून जिग्नेश मेवाणी आणि ओबीसींच्या प्रश्नावरून अल्पेश ठाकोर याने संघटन सुरू केले. जीएसटीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांच्या नाराजीला हवा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कधी नव्हे ती गुजरातमध्ये आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली. राहुल गांधीच्या मंदिर भेटीमुळे हिंदुत्ववाचा मुद्दा बोथट झाला. त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेही भाजपाच्या गोटात धाकधुक निर्माण झाली होती. प्रचाराला सुरुवात झाल्यावर तर काँग्रेसने गुजरात गमावल्यात जमा होते. परिस्थिती प्रतिकूल असताना अखेर अमित शहा आणि नरेंद्र मोदींना मोर्चा सांभाळावा लागला. काँग्रेसच्या जातीय समीकरणावर उतारा म्हणून अमित शहांनी धर्माचे कार्ड खेळण्याचा जुगार खेळला. तर मोदींनीही आपल्या प्रचारसभांमधून पाकिस्तान, गुजराती अस्मिता आदी मुद्द्यांना हवा दिली. त्यात मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजपासाठी टॉनिकचे काम केले. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या बाउन्सरच्या माऱ्यावर गुजरातमधील भाजपा इतकेच काय खुद्द अमित शहा व मोदींची जोडी पुरती शेकून निघाली होती. मात्र याचदरम्यान मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा नीच असा उल्लेख करून मोदी आणि भाजपाला फुलटॉस दिला. या संधीचा लाभ उठवणार नाहीत ते मोदी आणि भाजपाई कसले. त्यांनी या वक्तव्याच्या जोरावर मतदानाच्या शेवटच्या टप्पात काँग्रेसच्या बाजूने वाहत असलेली हवा आपल्या दिशेने फिरवली. त्यात अमित शहांनी पन्ना प्रमुख ही संकल्पना राबवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भूतकाळात केलेल्या विकासकामांना उजाळा देत मोदींनी जनतेला भावनिक साद घातली. या सर्वांचा परिणाम म्हणून गुजरातमधील जवळपास हरलेली निवडणूक भाजपाला जिंकता आली. पण मिळालेल्या कौलामधून भाजपाला इशाराही मिळालाय. त्याची गंभीर दखल न घेतल्यास भाजपाची भविष्यातील वाटचाल अडचणीची होई शकेल.
हारी बाजी को जितना उन्हे आता है!!!
By balkrishna.parab | Published: December 18, 2017 5:29 PM