नवी दिल्ली- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत दिर्घ काळानंतर समोर आली आहे. हनीप्रीतने आजतक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतील मी आणि राम रहीम पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा हनीप्रीतने केला आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये पवित्र नातं असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत म्हंटलं आहे.
इतके दिवस गायब असण्याच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, मला काही समजत नव्हतं. मी हरियाणातून कशीतरी दिल्लीला गेले. आता हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पणाच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, यासाठी ती कायदेशीर सल्ला घेणार आहे. 'सिरसामध्ये जे काही घडलं त्यामुळे मी खूप घाबरले होते. माझी तेव्हाची मानसिक अवस्था आता सांगता येणार नाही. मला कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया माहिती नव्हती. मी माझ्या वडिलांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये कशी गेली? असा सवाल मला लोक विचारतात पण ही गोष्ट कोर्टाच्या परवानगी झाली, असं हनीप्रीतने या मुलाखतीत म्हंटलं आहे.
सिरसामध्ये दंगल भडकविण्याचा आरोप हनीप्रीतवर आहे. पण या मुलाखतीत हनीप्रीतने तिच्यावरचा आरोप फेटाळून लावला. दंगड भडकताना मी दिसते आहे असा एखादा व्हिडीओ मला दाखवा, असं तिने म्हंटलं. काही लोकांना मुद्दामून दंगल भडकविण्यासाठी पाठविण्यात आलं होतं, असा खुलासा तिने केला. या मुलाखतीत हनीप्रीतला डेऱ्यामध्ये असलेल्या रहस्यांबद्दल विचारण्यात आलं. जी लोक डेऱ्यात मानवी सांगाडे असल्याचा दावा करतात त्यांना एक तरी सांगाडा तेथे सापडला का ? असा सवाल तिने विचारला आहे. ज्या दोन मुलींनी राम रहीमवर आरोप लावले, त्या मुली समोर कधी समोर आल्या का ? राम रहीमला फक्त चिठ्ठ्यांच्या आधारावर दोषी ठरविण्यात आलं, असं म्हणत राम रहीम निर्दोष असल्याचा दावा हनीप्रीतने केला आहे.
माझं आणि माझ्या वडिलांचं नात खूप पवित्र आहे. वडील मुलीचं नात जितकं पवित्र असतं तितकंच आमचंही नात पवित्र आहे. वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही का ? वडील मुलीचे लाड करू शकतं नाही ? असे प्रश्न तिने उपस्थित केले आहेत. या मुलाखतीत हनीप्रीतने तिचा पूर्व पती विश्वास गुप्ताच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं.
आज हनीप्रीत कोर्टात आत्मसमर्पण करण्याची शक्यतामहिन्याभरापासून बेपत्ता असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत मंगळवारी दुपारी कोर्टात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. राम रहीमला अटक झाल्यानंतर हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराचा आरोप हनीप्रीत आणि डेराच्या काही अनुयायांवर ठेवण्यात आला.