हरित्वार - ऋषिकेश येथील 83 वर्षांचे संत स्वामी शंकर दास यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे महादान केले आहे. त्यांचे हे महादान पाहून सर्व जण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे स्वामी शंकर दास हे गेल्या 60 वर्षांपासून गुहेत राहतात. यासंदर्भात बोलताना स्वामी शंकर दास यांनी सांगितले, की त्यांचे गुरू टाट वाले बाबा यांच्या गुहेत मिळणाऱ्या श्रद्धाळुंच्या अनुदानातून त्यांनी हे पैसे जमवले आहेत.
स्वामी शंकर दास हे बुधवारी ऋषिकेश येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत एक कोटी रुपयांचा चेक घेऊन पोहोचले, तेव्हा तेथील कर्मचारी हैराण झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अकाउंट चेक केले, तेव्हा त्यांचा चेक बरोबर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले.
स्वामी शंकर दास महाराज यांनी हा एक कोटी रुपयांचा चेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुदामा सिंगल यांना दिला. यावेळी स्वामी शंकर दास म्हणाले, की त्यांनी अनेक वर्षांपासून हा निधी श्री राम मंदिरासाठीच जमा केला होता. शंकर दास महाराज यांचे जीवन अत्यंत साधे आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यातील 60 वर्ष गुहेत राहूनच घालवली आहेत. टाट वाले बाबा हे त्यांचे गुरू होते. ते महर्षि महेश योगी, विश्व गुरू महाराज आणि मस्तराम बाबा यांचे समकालीन होते.
वेद निकेतनमधील महामंडलेश्वर स्वामी विजयानंद सरस्वती यांनी सांगितले, की टाट वाले बाबा स्वामी शंकर दास महाराज यांनी सर्व सुख सुविधांचा त्याग केला होता. गेल्या 40 वर्षांपासून ते श्री राम मंदिरासाठी पैसे जमा करत आले आहेत. गुहेसारख्या त्यांच्या आश्रमात या वर्षांत अनेक श्रद्धाळू आले. ते दानही करत होते. आज अयोध्येत भव्य श्री राम मंदिर होत आहे, अशा वेळी त्यांनी योग्य वेळ पाहून हे समर्पण केले आहे. यावेळी स्टेट बँकेचे मॅनेजर विक्रम नेगी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य रीतेंद्र चौहानही उपस्थित होते.