“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायत, मोठ्या दबावामुळे राजीनामा दिला”; काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:48 AM2021-10-05T08:48:08+5:302021-10-05T08:48:51+5:30
पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली आहे.
देहरादून: गेल्या काही दिवसांपासून पंजाबकाँग्रेसमध्ये सुरू असलेला कलह अद्यापही शमताना दिसत नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांची मनधरणी सुरू असली, तरी त्याला यश येताना दिसत नाही. नवज्योत सिंग सिद्धू आपली भूमिका आणि मागण्यांवर ठाम आहे. यातच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये राहणार नसल्याचे स्पष्ट केल्याने पक्षाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. यातच आता पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला असून, ते भाजपला मदत करत आहेत. दबाव आणि जबाबदारी झटकण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला, असा आरोप रावत यांनी केला आहे. (harish rawat criticized captain amrinder singh over resign and to quit congress)
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. तसेच अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमध्ये राहणार नसल्याचेही म्हटले होते. यानंतर काँग्रेसमधून त्यांच्यावर टीका करण्यात आली. पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली आहे.
अमरिंदर सिंग भाजपवाल्यांना मदत करतायत
कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत. भाजपचा अमरिंदर सिंग यांच्यावर मोठा दबाव आहे. आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. पक्षाने अमरिंदर सिंग यांना असे काही करण्यास सांगितले नव्हते, असा दावा रावत यांनी केला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्षाला मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसेही झाले नाही. भाजपसह ते अकाली दलालाही मदत करत आहेत. वेळच्या वेळी प्रश्न सोडवले असते, तर ही वेळ आली नसती, असे रावत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार परनीत कौरसुद्धा काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये १५ जागा मिळणेही कठीण आहे. अमरिंदर सिंग हे एक सैनिक आहेत त्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच विजयी होतील, असे सांगत कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन संपवण्यासंदर्भात अमरिंदर सिंग हे भाजप सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच यासंदर्भातील चांगली बातमी समोर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.