नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. हरिश रावत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच ही मागणी करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे. सोनिया गांधी यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं. तसेच मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे यांना भारतरत्नने सन्मानित करावं असं हरिश रावत यांनी म्हटलं आहे.
"सोनिया गांधी आणि मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाल किंवा नसाल. मात्र सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा यावर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा" असं हरिश रावत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आलंय की ज्यांना देशाच्या अन्नदात्याचं दु:ख कळत नाही", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे. देशातील जनभावनेला महत्व न देणं हे भारतासारख्या लोकशाहीच्या देशात जास्त काळ टीकू शकणार नाही. शेतकरी आंदोलक केंद्राच्या जाचक कायद्यांसमोर अजिबात झुकणार नाहीत, असं सोनिया यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.