नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत कुरबुरी सातत्याने चव्हाट्यावर येत असून, त्यातून दिलासा मिळण्याऐवजी भरच पडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीमधील एक सदस्य असलेल्या हरीश रावत (Harish Rawat) यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही. त्यांनी आधी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि नंतरच आपले ज्ञान पाजळावे, अशी टीका हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यासंदर्भात केली आहे.
हरीश रावत यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच वादाला नवे तोंड फुटू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसकडून नेत्यांना लालूच दाखवून पक्षात प्रवेश करून घेतला जात आहे. हा सगळा काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे विरोधकांचे ऐक्य मजबूत होणार नाही, असेही रावत यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे
प्रशांत किशोर यांच्याबाबत बोलताना हरीश रावत म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि स्वतंत्रता आंदोलन तसेच काँग्रेसवर, काँग्रेस विचारसरणीवर विश्वास ठेवणारी आहे, ती व्यक्ती पक्षात प्रवेश करू शकते. त्यामुळे प्रशांत किशोरही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. आम्ही नेहमीच नवीन विचारांचे स्वागत केले आहे. मात्र, काही झाले, तरी काँग्रेस पक्ष कोणाही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. ती व्यक्ती कितीही सक्षम असली, तरी आता सगळे तुम्हीच सांभाळा, असे काँग्रेसमधील कोणीही म्हणणार नाही. आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि नंतर ज्ञान द्यावे, असा टोला हरीश रावत यांनी लगावला आहे. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते.
दरम्यान, संसदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या कार्यकारणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नवीन अध्यक्ष निवडीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. काँग्रेस कार्यकारणीच्या या बैठकीत कुठल्याही शिस्तभंगाच्या कारवाईवर चर्चा होणार नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे. काँग्रेसच्या कार्यकारणीच्या या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. यात अध्यक्ष पदासाठी निवडणूकही घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्षात सर्वांना सामावून घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.