माजी मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या निवडणूक प्रचारासाठी मागितली आर्थिक मदत, QR कोडही केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:30 AM2024-04-11T09:30:40+5:302024-04-11T09:31:47+5:30
Lok Sabha Elections 2024 : हरीश रावत आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रचार करत आहेत.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा मुलगा वीरेंद्र रावत हे हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. हरीश रावत यांनी जनतेला पाठिंबा देण्याचे तसेच आपल्या मुलाच्या प्रचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. हरीश रावत आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रचार करत आहेत. ते जनतेला काँग्रेस आणि त्यांच्या मुलाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्र्यांनी जनतेला आपल्या क्षमतेनुसार क्यूआर कोडद्वारे मदत करण्याचे आवाहन केले आहे. हरीश रावत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काँग्रेस उमेदवार वीरेंद्र रावत यांचे बँक खाते आणि क्यूआर कोड देखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये हरीश रावत यांनी लिहिले आहे की, काँग्रेसची बँक खाती गोठवल्यामुळे पक्षाकडे संसाधनांची तीव्र कमतरता आहे. अशा स्थितीत निवडणुकीचा प्रचार निधीअभावी थांबू नये, यासाठी काँग्रेस उमेदवाराला मतांसह निवडणूक लढवण्यासाठी देणग्या स्वरूपात मदत करा.
दरम्यान, हरीश रावत यांच्या आवाहनावरून काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार वीरेंद्र रावत यांच्या निवडणूक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते मनोज सैनी यांनी वीरेंद्र रावत यांच्या खात्यात १०१ रुपये आणि समर्थ अग्रवाल यांनी ५०० रुपये दिले आणि पक्षाच्या आर्थिक संकटात मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
#संघर्ष_का_साथी_हूं_मदद_करें_मान_रखें
— Harish Rawat (@harishrawatcmuk) April 9, 2024
भाइयों और बहनों आपको मालूम है कि हमारी पार्टी का खाता सीज कर दिया गया है। संसाधन का हमारे पास पूर्णतः अभाव है। यदि आपके मन मेरी मदद करने की भावना हो तो कृपया हरिद्वार संसदीय क्षेत्र के लोकसभा उम्मीदवार ..1/2 pic.twitter.com/zksSaVSh8p
हरीश रावत यांना जनतेची दिशाभूल करायची आहे - उमेश कुमार
दुसरीकडे, हरिद्वार लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उमेश कुमार यांनी हरीश रावत यांच्या मुलाच्या निवडणूक प्रचारासाठी जनतेकडून आर्थिक मदत मागितल्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोती बाजारातील रोड शो दरम्यान उमेश कुमार म्हणाले की, आपण हरीश रावत यांना देणगी देण्यासही तयार आहोत, मात्र त्याआधी हरीश रावत यांनी मुख्यमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांचा हिशेब द्यावा. हरीश रावत यांना भावनिक बोलून जनतेची दिशाभूल करायची आहे, मात्र जनता त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही, असे उमेश कुमार म्हणाले.