नवी दिल्ली : विदर्भाचे सुपुत्र आणि भारतातील सर्वात महागडे, अग्रगण्य निष्णात वकील म्हणून ख्याती असलेले हरीश साळवे यांना सिंगापूरच्या ‘कोर्ट आॅफ अपील्स’ या ज्येष्ठ न्यायालयाने एका पक्षकाराचे वकील म्हणून युक्तिवाद करण्याची मुभा देऊन एक मान दिला.सिंगापूरच्या न्यायालयांमध्ये फक्त स्थानिकांना व इंग्लंडमधील बॅरिस्टर असणाºया ‘क्वीन्स कौन्सेल’नाच वकिली करू दिली जाते. विशेष प्राविण्य असलेल्या परदेशी वकिलाने बाजू मांडणे गरजेचे आहे, हे पक्षकाराने पटवून दिले तरच विरळा प्रकरणांत सिंगापूरबाहेरच्या वकिलास परवानगी दिली जाते. स्वत: बॅरिस्टर असलेले साळवे असा मान मिळालेले पहिले भारतीय वकील आहेत. रनबक्शी या मुळच्या औषधनिर्मिती कंपनीचे संस्थापक प्रवर्तक मलविंदर आणि शिविंदर सिंग यांच्यावतीने साळवे ‘कोर्ट आॅफ अपील्स’मध्ये उभे राहतील. सिंगबंधूंनी सन २००८ मध्ये कंपनी जपानच्या दायीईची सॅनक्यो कंपनीस ४.६ अब्ज डॉलरना विकली होती. ती विकताना प्रवर्तकांनी महत्वाची माहिती दडवून ठेवून फसवणूक केली, असा आरोप जपानी कंपनीने केला. तो वाद लवादाकडे गेल्यावर सिंग बंधूंनी नुकसानभरपाई म्हणून २,५०० कोटींहून अधिक रक्कम द्यावी, असा निवाडा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दिला गेला. त्याविरुद्ध सिंग बंधूंनी सिंगापूरच्या न्यायालायत अपील केले. त्यात साळवे यांना वकील म्हणून बाजू मांडू देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तो निकाल रद्द करून ‘कोर्ट अपील्स’ने त्यांना आता मुभा दिली.
हरीश साळवेंना सिंगापूर कोर्टाचा मान; वरिष्ठ न्यायालय ‘कोर्ट आॅफ अपील्स’ने दिली युक्तिवादाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:06 AM