नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहेत. येत्या २८ तारखेला ते मैत्रीण कॅरोलीन ब्रॉसार्डशी लंडनच्या चर्चमध्ये लग्न करणार आहेत. साळवे यांनी जूनमध्ये पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट दिला. ३८ वर्षांचा संसार केल्यानंतर साळवे यांनी काडीमोड घेतला.यांना दोन हरीश साळवे आणि मीनाक्षी मुली आहेत. साळवे यांचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलीन यांच्याशी संबंध आहेत. साळवे आणि कॅरोलीन या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. कॅरोलीन या ५६ वर्षांच्या असून, त्या व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलीनशी भेट झाली. या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली. देशातील आघाडीचे उद्योगपती आणि व्होडाफोन, रिलायन्स, मुकेश अंबानी, रतन टाटा यांचेही खटले साळवे यांनी लढले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे यांचे पुत्र असलेले हरीश साळवे सध्या ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये साळवे यांनी भारत सरकारची भक्कमपणे बाजू मांडली आहे.