नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी भारतात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याचं रविवारी मान्य केलं आहे. मात्र हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. याआधी ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलं होतं.
हर्षवर्धन यांनी "संडे संवाद" या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला. "पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाही आहे. हा फक्त मर्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे" अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर समूह संसर्गाची कबुली दिली आहे. यापूर्वी त्यांनी नेहमी समूह संसर्ग झाला नसल्याचं म्हणत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना दुर्गापूजा उत्सवात सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. 'सण-उत्सवाच्या काळात कोरोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. राज्यात करोनाच्या समूह संसर्गाची काही प्रकरणंही समोर आली आहेत' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा
देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे. समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात कोरोनाग्रस्ताची संख्या ही 10.6 मिलियन अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही असं देखील समितीने म्हटलं आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीचं गठण करण्यात आलं होतं. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीने दिलेल्या माहितीनुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 1.14 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.