नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले.
हर्षवर्धन यांच्या मागणीवरुन काँग्रेस खासदारांनी गोंधळ करत केंद्रीय मंत्र्याच्या दिशेने धावत गेले आणि त्यांना घेराव घातला. सभागृहात गोंधळ संपत नसल्याने अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केले.
या प्रकरणावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सभागृहात कॉंग्रेसच्या खासदारांची वर्तवणूक गुंडगिरीची होती. 'राहुल गांधींच्या भडकाऊ भाषणानंतर ते हिंसेच्या मार्गावर चालले आहेत. डॉक्टर हर्षवर्धन यांच्याशी गैरवर्तन करण्याचा हा प्रयत्न होता. यातून कॉंग्रेसची निराशा आणि गुंडगिरी दिसून येते असं त्यांनी सांगितले तर भाजपा खासदार जगदंबिका पाल म्हणाले की, कॉंग्रेसच्या खासदारांची वृत्ती लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन राहुल गांधींचे विधान वाचत होते, त्यावेळी कॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर त्यांच्या दिशेने आले. देशाच्या लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
राहुल गांधी यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी डॉ. हर्षवर्धन सभागृहात उभे होते. यावेळी त्यांनी सुरुवात करताना राहुल गांधी यांनी ज्या असभ्य भाषेचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केला त्याचा निषेध करतो असं म्हटल्यानंतर काँग्रेसचे खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
काँग्रेस खासदारांच्या गोंधळानंतरही हर्षवर्धन यांनी आपलं निवेदन सुरुच ठेवले. त्यांनी सांगितले की, या देशातील युवावर्ग सहा महिन्यानंतर नरेंद्र मोदी यांना काठीने मारुन देशाच्या बाहेर काढतील असं राहुल गांधी म्हणतात. स्वत: राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यामुळे वडील पंतप्रधान राहिले असताना इतर कोणत्याही पंतप्रधानांसाठी अशी निंदनीय भाषा कशी वापरू शकतात असा सवाल त्यांनी केला.
हौझ काझीच्या सभेत काय म्हणाले राहुल गांधी?दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी बुधवारी हौझ काझी येथील आपल्या सभेत पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह विधान केले होतं. 'हे नरेंद्र मोदी भाषण देत आहेत, 6 महिन्यांनंतर ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. भारतातील युवा त्यांना अशा काठीने मारतील, ते त्यांना समजावून सांगतील की हा देश तरुणांना रोजगार दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले होते.