नवी दिल्ली : 1984च्या शीख दंगली प्रकरणात काँग्रेस नेता सज्जन कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर या निर्णयाचे भाजपा आणि अकाली दलाने स्वागत केले आहे.
केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. हजारो विधवांना या निर्णयाची प्रतीक्षा होती. माझ्या आताही लक्षात आहे की, त्या दंगलीत किती निष्पापांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. मला आताही तो क्षण आठवल्यास अंगावर शहारे येतात. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांच्या इशाऱ्यावरून हे सर्वकाही घडले होते, असे सांगत हरसिमरत कौर यांनी काँग्रेसवर टीका केली. याचबरोबर, 1984च्या दंगलीत काँग्रेसचा हात नाही काय, असा प्रश्न मी राहुल गांधींना विचारू इच्छिते. तसेच पंतप्रधानांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी तयार केल्याने मी त्यांची आभारी असल्याचेही यावेळी हरसिमरत कौर म्हणाल्या.
दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवले. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने सज्जन कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र, हत्या प्रकरणात सज्जन कुमार यांची मुक्तता झाली आहे.