ऑनलाइन लोकमत -
गोरखपूर, दि. २५ - वर्ल्ड टी-20 मध्ये आतापर्यंत झालेला सर्वात अतिरंजक सामना कोणता असेल तर तो म्हणजे भारत - बांगलादेशदरम्यान बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला सामना... जिथे भारताने अवघ्या एका रनने हा सामना जिंकला. ही मॅच पाहताना अनेकांचे श्वास रोखले गेले होते. दोन्ही संघाच्या चाहत्यांचे ह्रद्याचे ठोके प्रत्येक बॉलला वाढत होते. मात्र या रोमांचक सामन्यामुळे उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
गोरखपूर जिल्ह्याच्या बिस्तोली गावात ओम प्रकाश शुक्ला यांचा ही मॅच पाहताना ह्रद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ओम प्रकाश शुक्ला मॅच पाहत होते. बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहीमने जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दीक पांड्याच्या गोलंदाजीवर सलग 2 चौकार मारले. त्यानंतर बांगलादेश हा सामना सहज जिंकेल आणि भारताचा पराभव होईल असं वाटू लागलं. त्याचवेळी ओम प्रकाश शुक्ला यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
ओम प्रकाश शुक्ला गेली अनेक वर्ष दिल्लीत राहत होते. दिल्लीत त्यांच किराणा दुकान होतं. सध्या ते कुटुंबीयांसोबत गोरखपूरमध्ये राहत होते. त्यांना तीन मुलं आहेत.