कुरुक्षेत्र- दिल्लीमध्ये घडलेलं निर्भया प्रकरण आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. दिल्लीतील निर्भयाप्रकरणासारखीच घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यात घडली आहे. जिंदमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. पीडित मुलीवर अमानूष अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणामुळे हरयाणात संताप व्यक्त केला जातो आहे. पीडीत मुलीच्या शरीरावर एकुण 19 जखमा आढळून आल्या आहेत. तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, छातीवर व हातावर जास्त जखमा आहेत, अशी माहिती डॉक्टर एस.के दत्तरवाल यांनी दिली आहे.
कुरुक्षेत्रमध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. 9 जानेवारीपासून ती बेपत्ता होती. गावातील एक २० वर्षांचा तरुणही त्याच दिवशी घरातून निघून गेला. त्यामुळे हे दोघंही पळून गेले असावेत, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना आला. यानंतर त्यांनी संबंधित तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
शुक्रवारी जिंदमध्ये एका कालव्यात एका मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पोलीस तपासात हा मृतदेह कुरुक्षेत्रमधील १५ वर्षांच्या मुलीचा असल्याचं स्पष्ट झालं. रविवारी रोहतकमधील वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं. पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं आहे. पीडित मुलीच्या गुप्तांग आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा असून त्या जखमा पाहता नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार तपास पथके स्थापन करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे हरयाणात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे. पीडित मुलगी ही दलित समाजातील असून ज्या तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल झाली तोसुद्धा याच समाजातील आहे. या प्रकरणातील 20 वर्षीय तरूणत संशयित आरोपी असला तरी त्यानंच हे कृत्य केल्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, मुलीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि आई-वडिलांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, हरयाणातील मंत्री के के बेदी यांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. बेदींनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.