जिंद - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. आईने पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून एका 17 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणातील जिंदमध्ये ही घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईने पबजी खेळण्यास विरोध केल्याने मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलाने दहावीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो घरीच होता. मात्र घरी असताना तो जास्त वेळ फोनमध्येच गुंतलेला असे. पबजी हा त्याच्या आवडीचा गेम असल्याने तो रात्री 12 वाजेपर्यंत हा गेम खेळत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. कित्येकदा नातेवाईकांनी मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने त्याकडे दुर्लक्ष केले.
शनिवारी मुलगा नेहमीप्रमाणे त्याच्या खोलीत पबजी खेळत बसला होता. त्यावेळी त्याच्या आईने त्याला पबजी खेळण्यापासून रोखले. रागाच्या भरात मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.
पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितलापबजीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर आता पबजीमुळे एका महिलेनं पतीकडून घटस्फोट मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गेमिंग पार्टनर आवडल्यानं एका मुलाची आई असलेल्या महिलेनं घटस्फोटाची मागणी केली. यासाठी तिनं महिला हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतदेखील मागितली. सध्या ही महिला पतीचं घरी सोडून माहेरी राहते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. पबजीमधला पार्टनर आवडल्यानं घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (181) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेनं दिली. कौटुंबिक वादामुळे नव्हे, तर पबजीमधील पार्टनरसोबत राहण्याची इच्छा असल्यानं घटस्फोट हवा असल्याचं महिलेनं हेल्पलाईनला सांगितलं.
'तो' सलग 45 दिवस PUBG खेळला, अन्...पबजी खेळण्याची सवय काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या जीवावर बेतली होती. सलग 45 दिवस पबजी खेळल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत पबजी खेळल्यामुळे मान सुजून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तेलंगाणातील जगतियाल या शहरात सलग 45 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत गेम खेळत असल्याने तरुणाला मान वळवताही येत नव्हती. मानेला सूज आल्यामुळे त्याच्या मानेत वेदना सुरू झाल्या होत्या. उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरलेपंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी जालंधरमध्ये ही घटना घडली. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळली होती. मुलाच्या वडिलांनी बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंतर आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली.