चंदिगड - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हरियाणामध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील नुह येथे एका 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली. आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानं तिनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलले. या प्रकरणी डीएसपी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशातील उन्नावमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. एका दलित महिलेनं तिच्या लहान मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. 'मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तिचे लैंगिक शोषण सुरू आहे', अशी तक्रार पीडित महिलेनं केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन वर्ष जुने आहे. उन्नाव येथील एका दलित मुलीवर दोन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. नराधमांनी या घटनेचा व्हिडीओदेखील बनवला व याबाबत कोणाला काहीही सांगितले तर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. वारंवार धमकी देत दोन वर्षांपासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.