चंदीगड : हरियाणा सरकारने अग्निवीरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अग्निवीर योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. हरियाणा सरकार पोलीस भरती आणि खाण रक्षक (मायनिंग गार्ड) भरतीमध्ये अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण देईल, असे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सांगितले.
याचबरोबर, राज्यातील गट क आणि ड भरतीमध्येही अग्निवीरांना वयात सवलत दिली जाणार आहे. तसेच अग्निवीरांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देखील दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटले आहे. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये अग्निवीर भरतीबाबत उत्साह निर्माण होईल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, माजी अग्निवीरांच्या भवितव्याबाबत आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अशा परिस्थितीत हरियाणामध्ये नायब सिंह सैनी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकारने अग्निवीर जवानांना पोलीस भरती आणि खाण रक्षक भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
तसेच, राज्यातील गट क आणि ड भरतीमध्ये वयात ३ वर्षांची सवलत दिली जाईल. याशिवाय गट क भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यासोबतच कोणत्याही अग्निवीर जवानाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षणकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) या केंद्रीय दलांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील ही माहिती आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी गेल्या आठवड्यात दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आरपीएफमध्ये काॅन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. आरपीएफमध्ये माजी अग्निवीरांचा समावेश झाल्याने हे दल अधिक सुसज्ज व समर्थ होणार आहे.