“केजरीवाल एक-दोन दिवसांत बाहेर येतील अन् काँग्रेस आघाडीबाबत निर्णय घेतील”: मनिष सिसोदिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:23 PM2024-09-04T20:23:48+5:302024-09-04T20:27:37+5:30
Haryana Assembly Election 2024: भाजपाला पराभूत करणे हीच आमची प्राथमिकता असून, हरयाणातील जनता भाजपा सरकारला कंटाळली आहे, असे मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
Haryana Assembly Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या ठिकाणी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडी करून निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही पक्षांत आघाडीचा निर्णय होणार की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे बोलले जात आहे. यातच आम आदमी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवणार का, याबाबत अरविंद केजरीवाल निर्णय घेतील, असे आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
हरयाणातील आंतरराष्ट्रीय पहिलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत या दोन पहिलवानांना तिकीट देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेटही घेतली.
अरविंद केजरीवाल एक-दोन दिवसांत बाहेर येतील
मनिष सिसोदिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सिसोदिया म्हणाले की, भाजपाला पराभूत करणे हीच आमची प्राथमिकता आहे. हरयाणातील जनता भाजपा सरकारला कंटाळली आहे. आघाडी होणार की नाही, झाली तर किती जागांवर होणार, याबाबत अरविंद केजरीवाल निर्णय घेतली. ते एक ते दोन दिवसांत बाहेर येणार आहेत, असा दावा मनिष सिसोदिया यांनी केला. आघाडीबाबत अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते निर्णय घेतली. ते जो काही निर्णय घेतली, त्याचा आम्ही मान राखू, असे हरयाणातील आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हरयाणातील काँग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांनी सांगितले की, आम आदमी पक्षासोबत चर्चा सुरू आहे. सीपीआय एम आणि समाजवादी पक्ष या दोन पक्षांनीही आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यांची मागणी मोठी नाही. ते केवळ या ठिकाणी स्वतःचे स्थान मजबूत करू पाहात आहेत. त्यांची काय मागणी आहे, ते पाहून ठरवले जाईल. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी केसी वेणूगोपाल यांच्याशी काय चर्चा केली, ते आम्हाला माहिती नाही. परंतु, जो काही निर्णय येईल, तो मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.