हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होऊ आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेसच्या नेत्या कुमारी शैलजा यांना भाजपामध्ये प्रवेशाची ऑफर देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता काँग्रेसने खट्टर यांच्यावरच जोरदार पलटवार केला आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली होती, असा दावा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे. तसेच याबाबत लवकरच आमचे नेते मोठा गौप्यस्फोट करतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
पवन खेरा म्हणाले की, हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या पक्षामधील काही बड्या नेत्यांशी संपर्क साधला होता. याबाबत आमच्या पक्षामधील बडे नेते लवकरच मोठा गौप्यस्फोट करतील. जर हे खरं नसेल तर मनोहरलाल खट्टर हे हा दावा फेटाळून का लावत नाहीत, असं आव्हानही पवन खेरा यांनी दिलं.
ते पुढे म्हणाले की, मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यानंतर ते खूप दु:खी झाले होते. पक्षप्रवेशासाठी आमच्या पक्षाकडे संदेश पाठवत होते. मात्र त्याबाबत काही होऊ शकलं नाही. दरम्यान, कुमारी शैलजा ह्या आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यांच्याबाबत भाजपावाले मूर्खासारखी विधानं कशी काय करू शकतात, असा प्रश्नही खेरा यांनी विचारला.
हरियाणाच्या जनतेच्या मनात भाजपाविरोधात संतापाची भावना आहे. हरियाणाचे लोक जेव्हा बटण दाबतील, तेव्हा बटण तुटू नये म्हणून निवडणूक आयोगाने मजबूत मशीन मागवल्या आहेत, असा टोलाही मनोहरलाल खट्टर यांनी लगावला.