Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:18 PM2024-09-28T12:18:23+5:302024-09-28T12:24:37+5:30
Babita Phogat And Vinesh Phogat : विनेश फोगाटवर बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेत्या विनेश फोगाटवर बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बबिताला विचारण्यात आलं की, विनेश फोगाट काँग्रेसमध्ये गेल्याने फोगाट कुटुंब विभागलं गेलं आहे का? यावर ती म्हणाली की, कुटुंब विभागलं गेलेलं नाही. प्रत्येकाची एक विचारधारा असते. कोणीही कधीही पक्षात सामील होऊ शकतो. हा तिचा (विनेश) स्वतःचा निर्णय आहे, कदाचित तिचा निर्णय आधीच ठरलेला असेल.
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बबिता फोगाटने महावीर फोगाट यांच्याबद्दलही मोठं विधान केलं आहे. बबिताला विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे महावीर फोगाट यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता, ती म्हणाली "ज्या मुलांना त्यांनी कुस्तीतील डावपेच शिकवले आहेत, त्यांनी कुस्ती पूर्णपणे सोडावी अशी कोणत्या गुरूची इच्छा असेल? आणि तेही राजकारणासाठी."
"विनेश फोगाट स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगत होती की, २०३२ पर्यंत खेळण्याचा तिचा प्लॅन होता, पण मग असं नेमकं काय झालं? यात कुठेतरी काँग्रेसचा डाव दिसतो. त्यांनी तिला मागे ढकललं आहे, खेळण्यापासून रोखलं आहे. २०३२ पर्यंत खेळण्याचा विचार असलेल्या व्यक्तीला तुम्ही (काँग्रेस) तिकीट देऊन निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे"
बबिताला विनेशला ज्याप्रकारे अपात्र ठरवण्यात आलं, हे षड्यंत्र आहे की काहीतरी कमतरता राहिली यावर देखील प्रश्न विचारला. त्यावर तिने हा कोणत्याही कटाचा भाग नसल्याचं सांगितलं. २०१२ मध्ये २०० ग्रॅममुळे वजनामुळे मी स्वत:च अपात्र झाले होते, याला कट म्हणायचं का? वजन कमी करणं ही खेळाडूची जबाबदारी असते असं म्हटलं आहे.