हरियाणा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात भाजपची हॅटट्रिक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पलवलमध्ये शेवटची जाहीर सभा पार पडली. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, "आज संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जग भारताकडे मोठ्या आशेने आणि अपेक्षेने बघत आहे. अशा स्थितीत हरियाणातील जनतेने भारताला अधिक बलशाली करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काँग्रेस देशाला कधीही मजबूत करू शकत नाही. यामुळे मी माझ्या हरियाणातील मतदारांना आग्रह करतो की, त्यांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद द्यावा.
काँग्रेसवर निशाणा - पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "काँग्रेस नेत्यांनी आरक्षण संपवण्याचे वक्तव्य करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जातीय हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याने हरियाणातील मागास आणि दलित समाज आधीच काँग्रेसवर नाराज आहे. यामुळे जनतेने काँग्रेसला पुन्हा एकदा कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणाच्या प्रत्येक गल्लीतून एकच आवाज येत आहे - 'भरोसा दिल से, भाजपा फिर से.'"
पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "काँग्रेस कधीही स्थिर सरकार देऊ शकत नाही, हे हरियाणातील जनतेला माहित आहे. काँग्रेसचे नेते आपापसात कसे भांडतात, हे हरियाणातील जनता पाहत आहे. विरोधी पक्षात असतानाही हीच परिस्थिती आहे. दिल्ली आणि हरियाणात बसलेल्या दोन खास कुटुंबांच्य शऱ्यावरून संपूर्ण हरियाणाचा अपमान होत आहे. यामुले हरियाणातील लोक अत्यंत दुख्खी आहेत.
'दलाल-दामाद' म्हणत हल्लाबोल - मोदी यांनी पुढे लिहिले, "हरियाणातील लोक जाणून आहेत की, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, जातीयवाद आणि घराणेशाहीची हमी. बापू-मुलाच्या राजकारणाचा मूळ उद्देश केवळ स्वार्थ आहे. काँग्रेस म्हणजे 'दलाल-दामाद'चे (जावई) सिंडिकेट आहे. आज हिमाचलपासून कर्नाटकपर्यंत काँग्रेस सरकारचे अपयशही लोकांना दिसत आहे. काँग्रेसची धोरणे जनतेला उद्ध्वस्त करत आहेत. यामुळे हरियाणातील जनतेला काँग्रेस अजिबात नको आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपने हरियाणातील लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे काम सातत्याने केले आहे. सर्व घटकांच्या हिताला आम्ही प्राधान्य दिले आहे."
आणखी काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी पुढे लिहितात, शेतकरी असो, तरुण असो, महिला असो, गाव असो अथवा शहरांचा विकास असो, आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. आम्ही हरियाणाला काँग्रेसच्या घोटाळे आणि दंगलीच्या युगातून बाहेर काढले आहे. थोड्याच वेळात हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. गेल्या काही दिवसांत मी राज्यभर फिरलो. लोकांमध्ये जो उत्साह दिसत आहे, तो पाहता हरियाणातील जनता पुन्हा भाजपला आपला आशीर्वाद देईल, असा माझा ठाम विश्वास आहे. हरियाणातील देशभक्त जनता काँग्रेसचे विभाजनवादी आणि नकारात्मक राजकारण कधीही स्वीकारणार नाही.